वाघ (Tiger) हा भारताच्या सामर्थ्य, अभिमान, जागरूकता, बुद्धिमत्ता आणि सहनशक्तीचे प्रतीक आहे, म्हणूनच त्याच्या संरक्षणासाठी दरवर्षी जगभरात २९ जुलै रोजी 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन' (International Tiger Day) साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे वाघाच्या संवर्धनाबद्दल देशाला जागरूक करणे. या माध्यमातून वाघाच्या संकटात सापडलेल्या प्रजातींचा बचाव होऊ शकेल.
याच दिवशी २०१० साली तेरा टायगर रेंज कंट्रीज (Tiger Range Countres) (भारत India, भूतान Bhutan, नेपाळ Nepal, व्हिएतनाम Vietnam, म्यानमार Myanmar, मलेशिया Malesia, इंडोनेशिया Indonesia, चायना Chaina, रशिया Russia, बांग्लादेश Bangladesh, थायलंड Thailand, लाओस Laos, कंबोडिया Cambodia) रशियामध्ये एकत्र आल्या आणि त्यांनी पुढच्या बारा वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत जगभरातील वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी काय करावे लागेल याची योजना आखली.
या सगळ्यामध्ये आपल्या भारत देशाला विशेष स्थान होते कारण जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी (सुमारे ३९०० पैकी) ८०% वाघ (नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार) आपल्या भारतात आहेत. त्यामुळेच भारतातील नॅशनल पार्क्स (National Partk) आणि अभयारण्यांना जगभरातील वन्यजीव प्रेमी वाघ बघण्यासाठी मोठ्या संख्येने भेट देतात.
जो वाघ भारतीय जंगलांच्या आरोग्याचा निर्देशक मानला जातो तो पट्टेरी वाघ मूळात भारतीय नाही हे माहित आहे का? खरंच आज भारतातील हिमालयातल्या जंगलांपासून ते राजस्थानच्या वाळवंटी भागापर्यंत आणि सुंदरबनमधल्या मँग्रूव्ह फॉरेस्टपासून ते केरळमधल्या सदा हरित जंगलांपर्यंत भारतात सर्वत्र आढळणारा वाघ मूळात सायबेरियाच्या बर्फाळ परिसरातला प्राणी आहे.
सुमारे अकरा-बारा हजार वर्षांपूर्वी वाघ तिथून भारताच्या भूमीवर आला. भारताच्या भूमीवर वाघाला अतिशय अनुकूल वातावरण होते. घनदाट जंगले, भरपूर भक्ष्य आणि भरपूर पाणी यामुळेच भारताच्या विविध भागांमध्ये वाघ स्थिरावला.
दुर्गा मातेचं वाहन म्हणून वाघाला धार्मिक महत्व आणि संरक्षण देण्यात आले आहे तरीही राजे-महाराजेंच्या काळात आणि ब्रिटिश राजमध्ये या जंगलाच्या राजाची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली.
१९ व्या शतकाला सुरवात व्हायच्या आधी भारतात चाळीस हजारांच्या आसपास पट्टेरी वाघ जंगलात शिल्लक होते पण पुढच्या अवघ्या चाळीस पन्नास वर्षांमध्ये भारतात फक्त दोन हजार वाघ शिल्लक राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळेच या राजेशाही आणि डौलदार शिकारी प्राण्याला वाचवले नाही तर भविष्यात वाघ फक्त प्राणी संग्रहालयात बघावा लागेल अशी भीती निर्माण झाली, त्यातूनच १९७३ साली भारत सरकारने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रोजेक्ट टायगर’ हा उपक्रम सुरू केला.
पहिल्या टप्प्यात नऊ राष्ट्रीय उद्यानांमध्ये सुरू झालेल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ प्रकल्पामुळे आता भारतातील ५० जंगलांमधील वाघांना संरक्षण मिळाले आहे.
तमिळनाडूतील मुदुमलाई पासून ते अरुणाचल प्रदेशमधील नामदफापर्यंत आणि राजस्थानमधील रणथंबोरपासून ते ओडिशामधील सिमलीपालपर्यंत भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या इको सिस्टिम्समधील वाघांना या प्रकल्पाने संरक्षण मिळाले आहे.
या प्रकल्पामुळे भारतातील वाघांचे संवर्धन होत आहे याची खात्री पटवणारे टायगर सेन्ससचे आकडे नुकतेच जाहीर झाले आहेत.
भारतातील विविध संरक्षित क्षेत्रांमध्ये व्याघ्र गणनेसाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. २०१८-१९ च्या गणनेनुसार भारतातील वाघांची संख्या २९६७ असल्याचे जाहीर करण्यात आले. २०१० मध्ये हाच आकडा होता १७०६.
मात्र भारतातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढलेली असली तरी व्याघ्र दर्शन फार सहज साध्य नाही. किती झालं तरी तो जंगलातला मुक्त वन्य पशू आहे.
नॅशनल पार्कमध्ये वाघोबांची भेट घ्यायची असेल तर आधी त्याला समजून घ्यावं लागतं. वाघ हा कॅट फॅमिलीमधला शिकारी प्राणी आहे मात्र तो कळपाने राहात नाही.
सर्वसाधारणपणे मिलनाच्या काळात नर-मादी एकत्र असतात तेव्हढेच. एकदा का मादीला पिल्लं होण्याची चाहूल लागली की ती जोडीदाराला लांब हाकलते. नंतर पिल्लांना जन्म दिल्यानंतर पुढची दोन वर्षे ती आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी अतिशय जागरुक आणि आक्रमक असते. त्याचबरोबर ही लहान पिल्ले खूप मस्तिखोर असतात त्यामुळे पिलांच्या मागे मागे तिला फिरावच लागतं, म्हणजे ज्या जंगलात बच्चे वाली मादी आह तिथे गेलात तर आई आणि पिल्ले बघायला मिळायची शक्यता जास्त असते.
नर वाघाचे तंत्र वेगळेच असते. त्याची स्वतःची अशी एक टेरीटेरी म्हणजे इलाका असतो. एका नर वाघाच्या ताब्यात सर्वसाधारणपणे दहा ते वीस स्क्वेअर किलोमीटरचा परिसर असतो आणि प्रत्येक नर वाघ आपल्या इलाक्यात रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक फेरी मारून कोणी घुसखोर (म्हणजे दुसरा नर वाघ) शिरलेला नाही ना याची खात्री करुन घेतो. नरांच्या इलाक्यात माद्यांना आडकाठी नसते. शिवाय ऐन उन्हाळ्यात जेंव्हा तापमान चाळीस आणि बेचाळीस डिग्रीचा पारा गाठू लागते तेंव्हा गरम हवेने हैराण झालेला वाघोबा हमखास एखाद्या झऱ्यावर नहीतर पाण्याच्या डबक्यावर ठाण मांडून बसतो.
0 Comments