International Youth Day 2021 : आंतरराष्ट्रीय युवा दिवस प्रत्येक वर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. भारतासाठी (India) तर हा दिवस अधिक खास आहे. कारण, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिवस ही जागतिक पातळीवर विविध उपक्रमांद्वारे युवकांचा आवाज जगभरात पोहोचवण्याची एक संधी आहे. आपल्याला सर्वांनाच माहित आहे कि, भारतात २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त तरुण आहेत. तर ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले ६५ टक्क्यांपेक्षा जास्त तरुण आहेत.
असं म्हटलं जातं कि, कोणत्याही देशाचं भविष्य हे त्या देशातील तरुणांवर अवलंबून असतं. इतकी मोठी जबाबदारी ही तरुणांवर आहे. त्याचसोबत त्यांच्यात तितकी किती ताकद आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यांची विचारधारा, मूल्य, प्रगती, प्रत्येक कृती, निर्णय, प्रत्येक पाऊल हे उद्याचा देश घडवत असतं. म्हणूनच आपल्या देशाच्या, समाजाच्या प्रगतीमध्ये मोठे भागीदार असलेल्या आपल्या युवकांना योग्य आणि निर्भीड मार्गदर्शनाची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२१ - उद्दिष्ट : आंतरराष्ट्रीय युवा दिवसाचा मुख्य उद्देश हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर तरुणांचा सहभाग आणि भूमिका यावर चर्चा करणे आहे.
हे सुद्धा वाचा : शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात झालेले तीन मोठे बदल
आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२१ : थीम (Theme)
प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्र सर्व जागतिक समुदाय आणि नागरिकांसाठी संबंधित थीम ठरवते. आंतरराष्ट्रीय युवा दिवसाची या वर्षीची थीम “ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टम्स: युथ इनोव्हेशन फॉर ह्युमन अँड प्लॅनेटरी हेल्थ” (Transforming Food Systems: Youth Innovation for Human and Planetary Health) ही आहे. यासह इतर आव्हानं देखील आहेत. उदा. हवामान बदल, आरोग्यसेवा, सामाजिक समावेश आणि जैवविविधतेचे संवर्धन हे प्रश्न देखील सोडवले जातील.
आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२१ : महत्त्व (Importance)
तर या दिवशी जगभरातील सरकारे आणि युवक एकत्र येतात आणि आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांकडे जगाचं लक्ष वेधतात. प्रत्येक राष्ट्रातील तरुणांना भेडसावणाऱ्या सामाजिक-आर्थिक आणि सामाजिक-राजकीय समस्या लक्षात आणण्यासाठी विविध जागरूकता मोहिमा, सामुदायिक मैफिली आणि कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
हे सुद्धा वाचा : NTA कडून NET परीक्षेची तारीख जाहीर
आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२१ : का साजरा केला जातो?
१७ ऑगस्ट १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय युवा दिवस १२ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी जबाबदार मंत्र्यांच्या जागतिक परिषदेने १९९८ मध्ये केलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेतला होता. आंतरराष्ट्रीय युवा दिवस सर्वात पहिल्यांदा २००० मध्ये आयोजित करण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२१ : कसा साजरा केला जातो?
दरवर्षी या दिवशी संयुक्त राष्ट्र एक थीम निवडते. या थीमनुसार, जगभरातील युवकांसाठी युवकांद्वारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. साधारणतः या कार्यक्रमांमध्ये जागरूकता मोहिमा, सामुदायिक मैफिली आणि कार्यक्रम, परेड, प्रदर्शन यांचा समावेश असतो. याशिवाय विविध माध्यमांद्वारे जगभरातील तरुणांशी संवाद साधला देखील जातो.
0 Comments