About Me

header ads

झरी : निखळ पाण्याचा वाहता झरा


सध्या कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) राज्यातील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद आहेत. विदर्भात (Vidarbha) कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी सुक्षेच्या दृष्टीने अद्यापही काही पर्यटनस्थळे बंदच ठेवण्यात आली आहेत. यामुळे नागरिक सुद्धा घरी राहून त्रस्त झाली आहेत. त्यातल्यात्यात पावसाळा म्हटलं की पावसात भिजण्याचा आणि धबधब्याचा आनंद लुटण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. आणि यामुळेच झरी हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सध्या कोरोनामुळे जवळपासचे सर्व ठिकाण बंद असल्यामुळे झरी येथे पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. (Zari waterfall place)


चिमूरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेलं 'झरी' वाघाईच्या डोंगरावर आहे. हे ठिकाण सौंदर्याने ओतप्रोत असलेले छोट्या-छोट्या धरणाचे ठिकाण आहे. जंगल भटकंती आणि निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी हे उत्कृष्ठ ठिकाण आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, चारही बाजूने हिरवेगार जंगल, खळखळ वाहणारा पाणी, मोठमोठे दगड, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय. हे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात.


येथे जाण्यासाठी मोटारसायकलने गेल्यास दोन किमी पायी जंगलातून पायवाटेने जावे लागते. तर कारने गेल्यास जवळपास चार किमी पायवाटेने जंगल तुडवत जावं लागतं. हे जरी खरं असलं तरी तिथे गेल्यावर दिसणारे निसर्गाचे रूप केवळ अवर्णनीय. झरी हे ठिकाण सुंदर आणि रमणीय आहे. सगळा परिसर हा अगदी घनदाट अरण्याचा आहे आणि तिथे आपल्याला बरेच छोटे-छोटे धबधबे पाहायला मिळतात. वर्षाऋतू मध्ये होणारा पाऊस येथील डोंगराला हिरवागर्द शालू नेसवतो.
ऐन पावसाळ्यामध्ये झरी या ठिकाणाला भेट देण्यासारखी दुसरी मजा नाही. येथील निसर्गाचा स्पर्श आपल्या मनाला अगदी मोहवून टाकतो आणि एक प्रकारची मनःशांती सहजच लाभते. तासनतास इथे बसून रहावेसे वाटते.


या ठिकाणाहून सात बहिणीचा डोंगर, मुक्ताई धबधबा हे पर्यटनस्थळे अगदी जवळच आहेत. आपल्या कुटुंबासोबत अथवा मित्र मंडळीसोबत एक दिवसाचा प्लॅन केल्यास हे तिन्ही निसर्गरम्य ठिकाणांचा एकाच दिवसात अनुभव घ्यायला मिळतो. (Jhari paryatan sthal)


झरी हे ठिकाण विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आहे. तालुक्यातील नावतळा या गावापासून दोन किमी अंतरावर आहे. सदर ठिकाण वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा या अभयारण्याच्या परिक्षेत्रात येत असल्याने येथे वाघाची भीती आहे. त्यामुळे जंगलातून पायवाटेने जात असताना ग्रुपने जावे. एकट्याने इकडेतिकडे कुठेही भटकू नका. हिरव्यागार जंगलाचा आणि निखळ वाहणाऱ्या झऱ्याचा आनंद लुटा.


Post a Comment

0 Comments