यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील (Tipeshwar) माझी पहिलीच जंगल सफारी (Jungale Safari आणि आयुष्यात पहिल्यांदाच एवढा मोठा धाडाधिप्पाड भारतीय वन्य जीवनाचा मानबिंदू असलेल्या पट्टेरी वाघाला (Tiger) पाहिलं. या वाघचं नाव होतं 'स्टार-मेल' (Starmale). रुबाबदारपणा, आक्रमकता आणि शिस्तबध्दता याचे अनोखे मिश्रण म्हणजेच स्टारमेल. याआधी फक्त वाघांविषयी बरच काही वाचलं होतं, ऐकलं होतं मात्र बघण्याचा योग कधीच आला नव्हता. कारण याला बघण्यासाठी त्याच्याच ‘टेरिटरीत’ जावं लागतं. गेल्यानंतरही तो लगेच दिसेल याची खात्री नसते. मात्र माझे नशीब की पहिल्याच सफारीमध्ये टिपेश्वर जंगलातल्या राज्याचे दर्शन झाले.
मी हा थरारक अनुभव आजच का बरं लोहतोय तर आज २९ जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन (International Tiger Day) आहे. त्यामुळेच या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न.
आम्ही दुपारी चार वाजता माथनी गेटमधून जंगलात प्रवेश केला. मी आणि सोबत असलेले मित्र जंगल डोळे भरून पाहत होतो. पण सगळ्यांच्या मनात एकच वादळ सुरू होतं की वाघाचे दर्शन कधी होणार. एक तास होऊनही वाघाचे दर्शन झाले नव्हते मात्र यादरम्यान जंगलातल्या विविध प्राण्यांनी मात्र आपापले दर्शन दिले होते. वाट समोर निघत होती आणि आम्ही त्याला बघण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होतो. जंगलातली उंच-उंच झाडे आकाशाला गवसणी घालण्यासाठी निघालेली. कधीकधी ती सगळी झाडे रांगेत उभी असल्यासारखी दिसत होती त्यामुळे खोडापर्यंतचा भाग अधिक स्पष्ट दिसायचा.
तेवढ्यात जंगलाच्या राज्याने आपल्या रुबाबात आपले दर्शन दिले. सगळ्यांची पहिलीच वेळ असल्यामुळे आम्ही घामागूम झालो. कारण तो साधारण वाघ नसून या अभयारण्यातील सर्वात मोठा 'स्टारमेल' नावाचा नर वाघ होता. ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि गाडी हळूहळू मागे घेतली. बसस्टँडवर चुकामूक झालेल्या मित्रांसारखी आमची सर्वांची अवस्था झाली. जंगलाचा परिसर त्या वाघाच्या मालकीचा होता. त्यामुळे तिथे रानडुकरासह मोरांनाही मनसोक्तपणे फिरण्याचा अधिकार नव्हता. करकोच्यांना नैसर्गिक पाणवठयाच्या काठावर उतरण्याची परवानगी नव्हती. त्या जंगलातल्या परिसराचा जणू तो राजाचं!
तो राजासारखाच मोठ्या ऐटीत चालत होता. त्याच्या पावलांची बोटे मातीवर उमटत जात होती. अंगावरील काळे पट्टे गुडघ्यापर्यंत पोहोचलेले. तांबूस विटकरी रंगाची फर अंगावर घेऊन मिरवतो. त्याच्या चालण्यातील ऐटदारपणा पाहून आपणही थक्क होतो. तो दिसेनासा झाल्यानंतर सुद्धा त्याची प्रतिकृती डोळ्यासमोर दिसत होती. आजही तो क्षण आठवलं की अंगावर शहारे येतात.
आम्ही सफारी डिसेंबर महिन्यात केली आणि या महिन्यात दिवस लहान असतो. त्यामुळे साडेपाच वाजताच सूर्य मावळतीला लागला. आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. लवकरच काळोख झाला त्यावेळी आम्हाला रात्रीची जंगल सफारी करत आहोत असा भास होत होता. सोबतच मनात भीती सुद्धा होती. एवढ्या घनदाट काळोख्या जंगलात कोणता प्राणी कुठून येईल हे सांगता येत नव्हते. जिप्सीचा लाईट जिथपर्यंत पोहचत होता तेवढाच भाग दिसत होता. एवढ्यात सोबत असलेल्या नेहाचा मोबाईल कुठेतरी पडल्याचं लक्षात आलं. मग एवढ्या काळोख्या अंधारात मोबाईल शोधणार तरी कसा. तेव्हा सोबत असलेला गाईड आणि ड्राइवरने गाडी रिव्हर्स घेतली आम्ही मागून मोबाईलच्या बॅटरी लावून मोबाईल शोधत होतो. जवळपास दीड दोन किलोमीटर मागे गेल्यानंतर मोबाईल खाली पडलेला दिसला. पण जिप्सी मधून उतरून तो मोबाईल उचलण्याची कुणाचीच हिम्मत झाली नाही. शेवटी गाईड हिम्मत करून खाली उतरला आणि मोबाईल घेतला. तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव आला.
सन २०१८ ला मास कम्युनिकेशन करत असताना गेलो होतो. यावेळी अजित सिंग, लोकशाही वार्ताच्या वनश्री पधरे मॅडम, नेहा डाहाट, निधी वैरागडे आणि पायल अडवाणी सोबत होते.
टिपेश्वर अभयारण्यात वाघांना ओळखण्यासाठी अन् आपल्या सोयीसाठी काही नावे दिलेली आहेत. शिकारी रोडवर दिसलेल्या वाघाला ‘स्टार’ हे नाव मिळाले. तोच ढाण्या वाघ म्हणून सर्वपरिचित आहे. माथणी गेटसमोर सागाच्या जंगलात उडी मारून पसार झालेली ‘आर्ची वाघीण’. टिपेश्वर गावाकडून टिपाई देवीकडे जाताना कोपऱ्यावर दिसलेला ‘लिटल स्टार वाघ’. ढाण्या वाघाची वंशवेल. अजूनही अनेक वाघ मुक्तपणे जंगलात भटकंती करताना आढळतात.
टिपेश्वर अभयारण्य अनुभवले आणि तेथील प्राण्यांचा जगण्यासाठीचा जीवनसंघर्षही अनुभवता आला. जंगलातून बाहेर येताना तेथील प्राण्यांच्या हाका अजूनही ऐकू येत होत्या. जंगल नुसते फिरण्यापुरते नसते. प्राण्यांचा अधिवास नष्ट होणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागते. हळूहळू जंगलाचे क्षेत्र नष्ट होते आहे. प्राणी आणि मानवी संघर्ष उद्भवू नये यासाठी राखीव जंगल आवश्यक आहे. वन्य पशुपक्षी ही निसर्गाची लेकरे आहेत हे विसरून चालणार नाही....
टिपेश्वर अभयारण्य
टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत विखुरलेले आहे.
हिरव्यागार वनराई मध्ये जवळपास १४८.६३ चौ.कि.मी. मध्ये अभयारण्य व्यापलेले आहे. आजूबाजूस वसलेल्या खेड्यातील नागरिक इमारती व जळाऊ लाकडासाठी बहुतांशी याच जंगलावर अवलंबून असतात. उंच डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांचा भाग असल्या कारणांमुळे याठिकाणी विविध जातीच्या वनस्पती आढळून येतात.
तसेच घनदाट जंगल क्षेत्र असल्या कारणांनी वेगवेगळे जंगली पशु पक्षी यांचा नेहमी वास असतो. वाघ, चितळ, सांबर, काळवीट, कोल्हा, अस्वल, मोर, माकड, नीलगाय, जंगली मांजर ई. प्रकारचे प्राणी या अभयारण्यात आढळून येतात
पर्यटनासाठी उत्कृष्ट कालावधी – एप्रिल-मे
1 Comments
खूप छान. रोमांचक अनुभव आणि प्रत्ययकारी वर्णन.👌👍
ReplyDelete