चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्यात सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत आणि पुढेही ही वाढ अशीच रहाणार आहे. हे चित्र सकारात्मक आणि आशादायी आहे. यासाठी झटणारे वनविभाग आणि वन्यप्रेमी संस्था या सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा.
मात्र वाघांच्या संख्येत वाढ सकारात्मक असली तरी याची दुसरी बाजू दुःखद आणि वेदनादायक आहे. मागील ४-५ वर्षांपासून वाघ आणि मानव संघर्ष अधिकच वाढलेलं आहे. मागील चार-पाच वर्षांपासून वाघाचे ग्रामीण भागातील मुक्त संचार वाढले आहे. सध्या जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना शेतीतील काम सुद्धा वाघाच्या दहशतीच्या वतावणात करावी लागत आहेत. म्हणूनच वाघ आणि मानव संघर्ष यावर समाधान शोधण्याच्या अनुषंगाने चर्चा होणे गरजेचे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात २०१४ मध्ये १११ वाघ होते. २०२१ पर्यंत वाघांची संख्या ३०० च्या वर गेली. या वाढीसोबतच वाघ-मानव संघर्षात १२२ नागरिकांचा मृत्यू झाला. यामुळे वन्यप्राणी आणि व्याघ्र संवर्धनही धोक्यात आले आहे. म्हणून अशा दुर्घटना होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
सध्या रोज विविध माध्यमातून वाघानी केलेल्या हल्ल्याच्या बातम्या बघत असतो किंवा वाचत असतो. घटनेनंतर जवळच्या पंचक्रोशीत नागरिक आपला रोष व्यक्त करतात. वाघाला बंदिस्त करण्याची मागणी केली जाते. राजकीय नेते मंडळी सुद्धा आपल्या राजकीय फायद्यासाठी कुटुंबाला भेट देतात. त्यानंतर काय होतं तर मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून विषय तिथेच संपविला जातो. विचार करा त्या कुटुंबातील गेलेली व्यक्ती परत येईल काय?
आशा दुर्घटना टाळण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र वन जमीन व वाघांच्या भ्रमणमार्गात वनीकरण व गवताळ प्रदेश, जंगलात जलसाठे, गावाजवळ मोह, फळझाडे, तेंदू झाडांची लागवड, शेतीसाठी सोलर कुंपण, गावाची जंगलावरील अवलंबिता कमी करणे, जंगलातील रस्त्यांना वन्यजीवांसाठी आतून मार्ग, वनशेतीला चालना, वाघ-मानव संघर्षासाठी स्वतंत्र सेलची स्थापना, जंगलात चाराईवर नियंत्रण, लोकांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात वन विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत.
२०१८मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार राज्यातील ३१२ वाघांपैकी १६० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात असल्याची नोंद आहे. मात्र तेव्हाच ही संख्या २००च्या घरात होती. २०२१ मध्ये वन विभागाकडे चंद्रपूर जिल्ह्यात २५० वाघ असल्याची नोंद आहे. मात्र ही संख्या सुध्दा ३००च्या घरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाढती वाघांची संख्या त्यांच्यातील जगण्याची स्पर्धा यातून वाघ नवनवे अधिवास स्विकारत आहे. यात जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील मानवनिर्मित झुडपं, काटेरी बाभळीचे मानवनिर्मीत जंगले तयार झाली आहेत. ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत वाघांचा वावर शेतशिवाराजवळ अधिक दिसून येतो. ब्रम्हपुरी सारख्या प्रादेशीक वनविभागातील वाघांची संख्या ही ५० पेक्षा अधिक आहे. निश्चितच देशातील व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्याच्या तुलनेत अधिकच आहे. यासोबतच येथे समस्याही तेवढ्याच जास्त आहेत. येथील वाघ पाळीव जनावरांवर अधिक निर्भर झाले असून यांचा वावर शेतशिवाराजवळ अधिक असल्याने वाघ-मानव संघर्षात वाढ झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अर्धेअधिक मृत्यू हे एकट्या ब्रम्हपुरी वनविभागात होतात.
आज चंद्रपूर जिल्हा मानव-वन्यप्राणी संघर्षाचे 'हाॅटस्पाॅट' बनले आहे. त्यामुळे पुढील काळात विदर्भातील काही जिल्ह्यात या समस्येत वाढ होण्याची चिन्हे अधिक आहेत. तेव्हा ‘पुढच्यास ठेस मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे 'प्रिवेशंन' म्हणुन जलद गतीने पावले उचलण्याची गरज आहे. व्याघ्र संवर्धन व वाढत्या वाघ-मानव संघर्षाच्या दिशेने आपणा सर्वांना कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील दशकभरातील व्याघ्र संवर्धन व वाघ-मानव संघर्षाची कारणे व उपाययोजनांचा विचार करता 'जिथे वाघ, तिथे योग्य नियोजन' असणे गरजेचे आहे. हे व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य पुरते मर्यादीत न ठेवता ज्या क्षेत्रात वाघ आहेत, वाघ निहाय संरक्षण व संर्वधनाच्या दृष्टीने नियोजन आखणे गरजेचे आहे. त्या क्षेत्रासाठी संसाधन आणी निधीची तरतुद केली पाहीजे. वन्यप्राण्याकडुन होणारी नुकसान भरपाई 'टायगर बेअरींग क्षेत्रात' पेंडीग राहता कामा नये. मा. मुख्यमंत्री महोदय यांनी चंद्रपूर जिल्हयातील वाघ-मानव संघर्षावर तांत्रीक अभ्यासगट तयार केलेला असुन त्यांचे रिकेमंडेशन अत्यंत महत्वाचे आहे. यानुसार वाघांच्या संख्येत वाढ होत असलेल्या लगतच्या जिल्ह्यांचा सुध्दा याचा विचार करण्याची गरज आहे.
तसेच व्याघ्र संवर्धन आणि वाघ मानव संघर्ष या दोन्ही बाबीवर काम करण्यास त्या-त्या जिल्ह्यातील विवीध विभागाने वनविभागासोबत सातत्यपुर्ण काम करण्यासाठी या संघर्षप्रवण भागातील गावांच्या व गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावरून योग्य नियोजन व आरखडे आखण्याची गरज आहे. तेव्हाच भविष्यात वाढत्या वाघांची संख्या यावर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त करीत आनंद साजरा केला जाईल...
0 Comments