About Me

header ads

सलाम तुझ्या कर्तव्याला


प्रशिक्षणादरम्यान बंदूक चालविताना गणेश

यश काय असतं? या प्रश्नाचं उत्तर तीच व्यक्ती उत्तम प्रकारे सांगू शकेल जी व्यक्ती गरिबीला, कुणाच्या बोलण्याला, आजूबाजूच्या नकारात्मक परिस्थितीला आपल्या ध्येयाच्या आड येऊ न देता अविरत प्रयत्न करून यश संपादन करते. माझ्या मित्रांमध्ये यशस्वी झालेले अनेक जण आहेत. त्यातीलच एक म्हणजे गणेश. गणेशने केलेले प्रयत्न मी जवळून बघितले आहेत. आज १५ ऑगस्ट याच दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि याच दिवशी गणेशचा जन्म झाला. आपलेही या मातृभूमीसाठी काही देणे आहे या उद्देशाने गणेशने आर्मी भरतीची तयारी सुरू केली आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपले प्रशिक्षण पूर्ण करून ऑगस्ट महिन्यात छत्तीसगड मधील सुकमा येथे बटालियन २१२ मध्ये जीडी कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला. आज गणेशचा वाढदिवस यानिमित्ताने मी त्याच्याविषयी व्यक्त होत आहे...


गणेश मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नांदगांव या खेडेगावातील एका शेतकरी कुटुंबातील मधुकर गुळधे यांचा मुलगा. मुलगा चांगला शिकून नोकरीला लागावं ही गणेशच्या वडिलांची इच्छा. गणेशचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. १२वी नंतर डी.एड. करून मुलगा शिक्षक होईल या आशेने वडीलांनी आपली जमापुंजी मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केली. मात्र, त्यावेळी झालेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे गणेशसारखे अनेक हुशार विद्यार्थी मागे पडले. गुणवत्ता नाही तर पैसा बघून नोकऱ्या मिळू लागल्या. मुलाच्या नोकरीसाठी पैसे भरण्याची गणेशच्या वडीलांची एवढी ऐपत नव्हती. म्हणून, गणेश खचला नाही, हताश न होता रडत बसला नाही आपल्या घरची परिस्थिती ओळखून त्याने काहीतरी करण्याच्या उद्देशाने नागपूर गाठले. 


गणेश शांत आणि संयमी होता. त्यामुळे नागपुरात आल्यानंतर त्याला त्याच्या मित्रांची खूप साथ मिळाली. सुरुवातीला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करू लागला. नंतर त्याला ५ हजार रुपये पगाराचा जॉब मिळाला (२०१४ मध्ये). जॉब करूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पुढे असे लक्षात आले की, जॉबमुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही. म्हणून गणेशने आधीचे जॉब सोडून एका अभ्यासिकेत जॉब करू लागला. इथे त्याला एकच काम होत ते म्हणजे अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यास... महिनाभर त्याचं राहणं आणि जेवण होईल एवढेच पैसे त्याला येथून मिळत होते. तरीसुद्धा तो समाधानी होता. एमपीएसी सोबतच गणेश पोलीस भर्ती, सीआरपीएफ यासारख्या परीक्षांचा अभ्यास आणि सराव करीत होता. या काळात त्यांनी कुठल्याच गोष्टीचा मोह केला नाही, भौतिक सोयीसुविधा पासून तो दूर राहिला आणि आपले प्रयत्न निरंतर सुरू ठेवले. वडील पैशाने गरीब असले तरी त्यांचा मुलाला या गोष्टीसाठी पूर्ण पाठिंबा होता, ते खंबीरपणे गणेशच्या पाठीशी उभे राहिले. 


सन २०१८ मध्ये गणेशने स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदासाठी होणारी परीक्षा दिली. आणि तो यासाठी पात्र झाला. मात्र, पुढची पायरी होती शारीरिक चाचणीची. निकालानंतर गणेश मोठ्या जोमाने शारीरिक चाचणीचा सराव करू लागला. या काळात गणेश फक्त ग्राउंडवरच असायचा.  कारण त्याला या संधीचं सोनं करायचं होतं. घरातील गरिबीचा अंधार दूर करायचं होतं. या काळातला एक प्रसंग मला सांगावंसं वाटते तो म्हणजे, शारीरिक चाचणीसाठी ८-१० दिवस बाकी असताना गणेशचं पाच किलो वजन जास्त येत होतं मग करायचं काय? तर या पाठयाने माहिती झालं त्या दिवसापासून जेवण करणेच सोडून दिले. फक्त काही फळ खाऊन तो राहत होता, आणि अशा पद्धतीने त्याने एवढ्या कमी दिवसात इतकं वजन कमी केलं. नंतर तो शारीरिक चाचणी मध्येसुद्धा यशस्वी झाला. यामागे गणेशची जिद्द आणि चिकाटी दिसून येते. 


असे म्हणतात की, आर्मीत लागणे खूप सोपे आहे मात्र, आर्मीचे ट्रेनिंग पूर्ण करणे हे खूपच अवघड आहे. अनेक मुलं तर ट्रेनिंगमधूनच पळून येतात. पण गणेश त्यातला नाही हे आम्हाला ठाऊक होते. गणेशची ट्रेनिंग राजस्थान मधील सुरतगड येथील आर्मी ट्रेनिंग सेंटर मध्ये झाली. यादरम्यान त्याने संपुर्ण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. रेतीमधून १५ किलोचे वजन अंगावर घेऊन ४०-४० किलोमीटर अंतर कसे पार कराचे हे अनुभव अंगावर शहारे आणणारे होते. यापेक्षाही कठीण टास्क त्यांनी पूर्ण केले. आणि आज गणेश आपली ट्रेनिंग पूर्ण करून छत्तीसगड येथील सुकमा येथे रुजू झाला. त्याच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम.


गावातील गणेश हा एकमेव मुलगा आर्मीत गेला. गावाची मान अभिमानानं उंचावली. जेव्हा गणेश ट्रेनिंग पूर्ण करून आला त्यावेळी गावातील नागरिकांनी त्याचे थाटात स्वागत केले मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमात गणेशचे आई-वडिल भारावून गेले डोळ्यात आनंदाश्रू आले. तो क्षण गणेशसाठी आणि त्याच्या आई-वडिलांची आनंदाचा, अभिमान होता. यामुळे गावातील अनेक मुलांना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. 

आज गणेशचं वाढदिवस. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. जे देशसेवेच व्रत हाती घेतलंस ते निरंतर करत रहा. खूप मोठा हो...

*वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सोल्जर💐🎂💐*

Post a Comment

0 Comments