कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती पूर्णपणे विस्कळीत झाली. आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारद्वारे विशेष प्रयत्न होताना दिसत नाही आहेत. कोरोना महामारीचा फटका म्हणून आरोग्य विभाग वगळता सर्व विभागांची पदभरती रद्द करण्यात आली होती. घोषित झालेल्या परीक्षा सुद्धा त्या-त्या विभागाकडून घेतल्या गेल्या नाही. अशावेळी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आणि अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून दिला. करणं त्यांच्या घरची हलाखीची परिस्थिती. काही काम करून अभ्यास करावं म्हटलं तर कोरोनाचं संकट त्यांच्या समोर उभं होतं. आता पुन्हा एकदा राज्य सरकार कडून १५ हजार ५११ पदे भरण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. राज्य सरकारने ही पदभरती लवकर पूर्ण करावी हीच अपेक्षा.
माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी (ता. १४) सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट 'अ' ते 'क' पर्यंतची एकूण १५ हजार ५११ पदे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘एमपीएससी’मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली.
पदे
गट अ : ४ हजार ४१७ पदे
गट ब : ८ हजार ३१ पदे
गट क : ३ हजार ६३ पदे
------------------------------
एकूण १५ हजार ५११ पदे
या पदांना वित्त विभागाने सन २०१८ पासून मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पदभरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
एमपीएससी सदस्यांची 4 पदे रिक्त
एमपीएससी सदस्यांची 4 पदे रिक्त आहेत आणि त्यामुळेच मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया ठप्प पडलेली आहे. म्हणूनच सर्वप्रथम एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. उशिरा का होईना आता जाग आली आणि सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या.
केरळ लोकसेवा आयोग
भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्यावरही चर्चा झाली. अंमलबजावणी कधी होणार कुणास ठाऊक.
यूपीएससी प्रमाणे संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक होणार जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत, अशी माहिती श्री. भरणे यांनी सांगितली.
0 Comments