ईएफसी समक्ष मनपा आयुक्तांनी केले सादरीकरण : महापौरांनी मानले ना. नितीन गडकरींचे आभार
नागपूर, ता. २७ : नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या (Nag River) पुनरूज्जीवन प्रकल्पाने पुढे पाउल टाकत प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. बुधवारी (ता.२७) दिल्ली येथे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (NMC Commissioner Radhakrishnan B. ) यांनी केंद्र शासनाच्या ‘एक्सपेन्डेचर फायनान्स कमिटी’ (ईएफसी) पुढे या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण केले. या प्रकल्पाला ईएफसी ने मंजुरी प्रदान केली असून पुढील अंतिम मंजुरीसाठी प्रकल्प आता कॅबिनेटकडे जाणार आहे. नागपूर शहरासाठी (Nagpur City) महत्वाकांक्षी ठरणा-या या प्रकल्पातील एका यशस्वी टप्प्याच्या पूर्णत्वाबद्दल नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Center Minister Nitin Gadkari) यांचे आभार मानले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून नागपूर महानगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. बुधवारी (ता.२७) दिल्ली येथील केंद्र शासनाचे वित्त विभाग सचिव यांच्या अध्यक्षतेत ‘एक्सपेन्डेचर फायनान्स कमिटी’ची बैठक झाली. या कमिटीमध्ये केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाचे सचिव, एनआरसीडी चे निदेशक, ईएफसी चे अतिरिक्त सचिव, वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव, सहसचिव (बजेट), शहरी विकास मंत्रालयाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीपुढे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहितीचे सादरीकरण केले. या बैठकीमध्ये मनपातर्फे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी व तांत्रिक सल्लागार मोहम्मद इस्राईल उपस्थित होते.
या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार असून यासाठी ‘पीएमसी’ नियुक्तीसंदर्भात जलदगतीने प्रक्रिया सुरू आहे. ‘पीएमसी’च्या संपूर्ण खर्चाचे वहन केंद्र शासनातर्फे करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येईल.
या प्रकल्पाचा एकूण खर्च २११७.५६ कोटी एवढा आहे.
प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून ६० टक्के म्हणजे १३२३.४२ कोटी, राज्य शासनाकडून २५ टक्के म्हणजे ४९६.३४ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे २९७.८० कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन जापानची वित्तीय संस्था ‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी)कडून १८६४.३ कोटी रुपये अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेकडून केली जाणार आहे.
यासाठी नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपुरकरांसाठी
महत्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आहे. प्रकल्पासाठीच्या ऋण करारामुळे प्रकल्पाच्या कार्याला लवकरच सुरूवात होण्याचे चिन्ह आहेत. त्यामुळे शहरातून वाहणा-या नाग नदीचा बदलता चेहरा-मोहरा नागपुरांच्या साक्षीने बदलणार आहे. (Nag River Rejuvenation Nagpur Municipal Corporation)
प्रकल्पातील प्रमुख मुद्दे
- अंबाझरी तलावातून नाग नदी उगम पावते.
- नाग नदीची एकूण लांबी ६८ किमी आहे.
- शहरी भागात नाग नदीची लांबी १५.६८ किमी आहे.
- नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत ३ नवे ‘एसटीपी’ (९२ एमएलडी) तयार करण्यात येतील
- तर २ ‘एसटीपी’ (१० एमएलडी) अद्ययावत (अपग्रेडेशन) करण्यात येईल
- प्रकल्पामध्ये १०७ ‘मॅनहोल’ वळण (मॅनहोल डायव्हर्सन)
- ४८.७८ किमी इंटरसेप्टर गडर
0 Comments