राज्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर धार्मिक स्थळे नवरात्रीच्या (Navratri Festival) पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून, तर ज्ञानाची मंदिर (School) असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी शुक्रवारी हे दोन्ही निर्णय जाहीर केले. (School and temple reopen in maharashtra)
मंदिरांच्या कळस दर्शनावर गेली कित्येक महिने समाधान मानाव्या लागणाऱ्या भक्तांना, तसेच शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. पालक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी राज्य शासनास दिले होते.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आला होता मात्र, राज्यात तिसरी लाट येण्याच्या भीतीने तो स्थगित झाला. तथापि, आता गणेशोत्सवानंतर रूग्णसंख्येच्या प्रमाणात कुठेही वाढ झालेली दिसली नाही. उलट रूग्णसंख्या कमी होत आहे.
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर २७ टक्के असून बहुतांश लोकांचे लसीकरण झाले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आधीपासूनच प्रयत्न करण्यात आले होते. यापूर्वी जुलैमध्ये कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.
मुलांना उपस्थिती बंधनकारक नाही
मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसेल तसेच शाळेत येण्याची सक्ती करण्यात येणार नाही. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य राहील.
भाविकांची इच्छापूर्ती
धार्मिक स्थळे कधी उघडणार याबाबत उत्सुकता होती. अखेर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी समस्त भाविकांची इच्छापूर्ती केली आहे. धार्मिक स्थळे खुली करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासन येत्या दोन - तीन दिवसांत जाहीर करण्याची शक्यता आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करुनच धार्मिक स्थळे खुली करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
या विद्यार्थ्यांची घेणार विशेष काळजी
शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या (Student) मनोवस्थेत बदल झाला असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विभागाने विद्यार्थ्यांची मानसिक काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) म्हणाल्या. वर्गात शांत बसणारे, कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे, जास्त चिडचिड करणारे, रागीट व छोट्याशा गोष्टीने निराश होणारे, वयाशी विसंगत वर्तणूक करणारे, खाण्याच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये बदल दर्शविणारे, असहाय्य सतत रडणारे अशा विद्याथ्यांची विशेष काळजी घेण्यात येईल .
खेळांना बंदी
शाळा सुरु होतील, पण सध्याच कोणतेही खेळ घेता येणार नाहीत असे शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकत नसेल. तथापि, जवळून संबंध येईल असे खेळ जसे खो-खो, कबड्डी हे टाळले जातील.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना
- एखादा विद्यार्थी आजारी असेल, त्याला आजाराची लक्षणे दिसत असतील तर तातडीने उपाययोजना करण्यात येतील.
- मुलांना गणवेशाची सक्ती नसेल, घरच्या कपड्यांवरही शाळेत जाता येईल.
- प्रत्येक शाळेत शक्य असल्यास हेल्थ क्लिनिक, विद्याथ्यांचे तापमान नियमितपणे तपासावे.
- इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घ्यावी. सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात.
- मुलांना शाळेत पायी येण्यासाठी प्रोत्साहित करावे.
- ज्या शाळांमध्ये स्कूलबस खासगी वाहनांद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी प्रवास करेल याची दक्षता घ्यावी.
- सॅनिटायझरचा वापर करावा.
- विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाइन सादर करावा. जेणेकरून विद्याथ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.
- गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करून घ्यावा. मुलाना कमीतकमी पुस्तके/वह्या आणाव्या लागतील, अशी व्यवस्था असावी, असे सांगण्यात आले आहे.
- सीएसआर फंडांतून शाळांनी पंखे, सॅनिटायझर, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करावीत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
0 Comments