आपल्या कानावर नेहमीच सरकारी, जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या शाळांबद्दल काहीतरी विचित्र नकारात्मक असं ऐकायला येत असतं. या शाळांमध्ये भौतिक सुविधा नाही, मुलांना शिकविण्यासाठी चांगले शिक्षक नाही, बसायला टेबल नाही अशा नाना तर्हेच्या तक्रारी नागरिक करताना दिसतात. आणि यामुळेच पालकसुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही सरकारी शाळेत न टाकता बक्कळ फी देऊन खासगी शाळा किंवा कॉन्व्हेंट मध्ये पाठवतात. कारण असं की खासगी शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते, सर्व भौतिक सुविधा असतात, मुलं कमी वेळात भराभर इंग्रजी बोलायला लागतात अशी पालकांची धारणा झालेली असते. त्यामुळेच आज सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर काही ठिकाणी विध्यार्थ्यांविना अनेक शाळा बंद सुद्धा पडल्या आहेत. परंतु चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळा या सर्व गोष्टींसाठी अपवाद आहेत. या शाळांबद्दल एक वेगळीच चर्चा सुरू आहे. कारणही तसेच आहे. चंद्रपूर शहरातील खासगी शाळा आणि कॉन्व्हेंट मध्ये शिकणारी मुलं अचानक मनपाच्या शाळेत येताना दिसत आहे. प्रत्येक वर्षी चंद्रपूर मनपाच्या शाळेतील पटसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. यंदा सुद्धा या पटसंख्येत तब्बल एक हजार विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. यामुळे खासगी शाळा आणि कॉन्व्हेंट रिकामी आणि मनपाच्या शाळा 'हाऊसफुल्ल' असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (Chandrapur Municipal Corporation school)
लागले हाऊसफुल्लचे बोर्ड
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने शिक्षणाचे दिल्ली मॉडेल रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला यशही मोठं मिळू लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे. इंग्रजी शाळातील विद्यार्थी (student) मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागल्यानं प्रवेश फुल झाल्याने प्रवेश आता थांबवण्यात आले आहेत. तसे बोर्डही शाळेबाहेर लागलेले आहेत.
सर्व सोयीसुविधायुक्त शाळा
चंद्रपूर महानगरपालिकेनं आता आपल्या शाळा अद्यावत करण्याचं ठरवलं. त्यादिशेनं पहिलं पाऊल महापालिकेनं टाकलं. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील शाळा आहे. पहिली ते दहावीचे वर्ग इथं चालतात. सेमी इंग्रजी माध्यम. शाळा बघताच एखादी खासगी शाळा असावी, असा भास होतो. शाळेचं केवळ बाह्य रूपच सुंदर आहे, असं नाही. अंतरंगही मनोवेधक आहे. शाळांच्या भिंती बोलक्या आहेत. बसण्याची व्यवस्था नेटकी. पिण्याचं स्वच्छ पाणी, अग्निशमन बंब, पंखे आणि शिक्षकांची पूर्ण उपस्थिती. दिल्लीतील शासकीय शाळांच्या धर्तीवर ही शाळा उभी करण्यात आली आहे.
कोरोनातही शिक्षण सुरूच
सध्या कोरोनामुळं शाळा बंद असून, ऑनलाईन शिक्षण दिलं जात असलं तरी ऑफलाईन शिक्षणासाठी काही विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. ज्यांना कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, अशा पालकांसाठी ही शाळा मोठी संधी निर्माण करून देणारी ठरलीय. शिक्षणाप्रति आस्थेवाईक असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं नवं दालन यानिमित्तानं उघडं झालंय.
सर्व शाळा होणार डिजिटल
महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि तेलगु शाळा शहरात सुरू आहेत. त्या सर्व शाळा येत्या काळात अशाच स्वरूपाच्या होणार आहेत. काम प्रगतीपथावर आहे. या शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण सुरु केल्यामुळे काॅन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. त्यामुळे २०१३ मध्ये केवळ ७० पटसंख्या असलेल्या या शाळेत आता ९०० वर विद्यार्थी आहेत. अजूनही प्रवेशासाठी विद्यार्थी येत आहेत. पण आता प्रवेश बंद करण्यात आलाय. महापालिकेच्या शाळेत प्रवेश "फुल्ल" झाल्याची पाटी लागावी, हीच मुळी अपूर्वाई आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण २९ शाळा कार्यरत आहेत. यात तीन शाळा तेलुगु, तीन हिंदी आणि दोन उर्दू शाळा आहेत. २१ शाळांत मराठी-सेमी इंग्रजी शिकवलं जातं. यात सोळा शाळांमध्ये नर्सरी, केजीचं शिक्षणसुद्धा दिलं जात आहे. येत्या काळात महापालिकेच्या सर्वच शाळा गुणात्मकरित्या विकसित केल्या जाणार असून, सर्वसामान्यांना शिक्षणासाठी सुदृढ वातावरण तयार केलं जाणार आहे.
२०१६-१७ मध्ये या सर्व शाळांतील विद्यार्थीसंख्या २५७१ होती. ती यावर्षी ३४५४ इतकी झाली आहे. सरकारी शाळांची अशी सुधारणा झाल्यास शिक्षणाच्या नावावर वारेमाप शुल्क घेणाऱ्या खासगी शाळांना नक्कीच चाप बसू शकेल, यात शंका नाही.
दहा शाळांच्या माध्यमातून सेमी इंग्रजी चे शिक्षण सुरू आहे.
शहरातील अनेक मराठी शाळांमध्ये दुप्पट पटसंख्या झाल्याचे उदाहरण या वर्षी पाहायला मिळत आहे. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मराठी माध्यमाचे ६२ शिक्षक हिंदी माध्यमाचे पाच शिक्षक उर्दू माध्यमाचे दोन शिक्षक आणि तेलुगु माध्यमातून पाच शिक्षक कार्यरत आहेत.
राज्यभरातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट
राज्यभरातील नगरपालिका आणि महापालिका शाळांतील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध शाळांना भेटी दिल्या. सध्या कोरोनामुळे शाळा बंद होत्या. अशावेळी ऑनलाईन शिक्षणाची सोय चंद्रपूर महापालिकेने सुरु केली. ज्या विद्यार्थाकडे ऑनलाईन सुविधा नाही, अशासाठी त्यांच्या घरी जाऊन ऑफलाईन शिक्षण देण्यात आले. ज्यांना कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, अशा पालकांसाठी ही शाळा मोठी संधी निर्माण करून देणारी ठरलीय. हा उपक्रमशील प्रयोग बघण्यासाठी राज्यभरातून शिष्टमंडळ चंद्रपूर शहरात आले होते.
0 Comments